कोल्हापूर- शेतकऱ्यांच्या जीवनातील जळजळीत वास्तव समाजासमोर यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत कोल्हापूरमध्ये पहिल्या नांगरट शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये ४ जूनला ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार प्रतिष्ठान यांच्यामार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी हे नांगरट साहित्य संमेलन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतले जाणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे करणार आहेत. या एक दिवसीय साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर चर्चा व्हावी, या चर्चेच्या माध्यमातून भविष्यकालीन शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दिशा ठरावी, यासाठीच त्याचे आयोजन केले आहे. हे संमेलन तीन सत्रात होणार आहे. उद्घाटनाच्या सत्रामध्ये संमेलनाचे उद्घाटक रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष राजू शेट्टी , निमंत्रक कवी संदीप जगताप व कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल वाघ हे मनोगत व्यक्त करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये शेतकरी प्रश्नांचे साहित्य, कला ,माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब या विषयावरचा परिसंवाद होईल. या परिसंवादात पत्रकार निखिल वागळे, इंद्रजित देशमुख ,चित्रपट निर्माते प्रवीण तरडे सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवी संमेलन होणार आहे.
कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीतर्फे पहिले नांगरट साहित्य संमेलन
