झुरिच
आपल्या रॉक संगीताने दीर्घकाळ हॉलिवूडवर राज्य केलेल्या गायिका आणि क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल म्हणून ओळखल्या जाणार्या टीना टर्नर यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी टीना यांनी स्वित्झर्लंडमधील झुरिचजवळील कुसनाच्त येथील घरी अखेरचा श्वास घेतला. ‘क्वीन ऑफ रॉक ‘एन’ रोल’ म्हणून टीना टर्नर यांना ओळखले जायचे. गायक, गीतकार, नृत्यांगना, अभिनेत्री आणि लेखिका अशा विविधांगी क्षेत्रात त्यांनी नाव कमावले.
टीना यांनी १९५७ मध्ये आयके टर्नरच्या किंग्स ऑफ रिदममधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. रॉक संगीत क्षेत्रात त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली. टीना यांनी चार दशकांत बिलबोर्ड टॉपमध्ये ४० हिट्स मिळवले. जगभरात १० कोटींहून अधिक त्यांचे रेकॉर्ड विकले गेले आहेत. त्यांना १२ ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आठ स्पर्धात्मक पुरस्कार, तीन ग्रॅमी हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि एक ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार यांचा समावेश आहे. रोलिंग स्टोनच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय कलाकार आणि पहिल्या महिला होत्या. दरम्यान, त्यांच्या निधनाने हॉलीवुडवर मोठी शोकळला पसरली आहे.