मुंबई
मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांना मांसाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टीबीग्रस्त रुग्णांना सकस आहार मिळेल, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई मधील शिवडी येथे मुंबई महापालिकेचे ७५० खाटांचे क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या ४५० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येते. या रुग्णांच्या जेवणाचे कंत्राट इस्कॉनला देण्यात आले होते. परंतु, या जेवणात आवश्यक पोषण, प्रथिने, लसूण आणि आले हे पदार्थ नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या आहारात मांसाहाराचा समावेश करावा, अशी मागणी होत होती. त्यानंतर मांसाहारी जेवणाचा समावेश करण्यासाठी तसा प्रस्ताव पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाकडे पाठवण्यात आला. सीपीडीकडे हा प्रस्ताव गेल्यावर याबाबत कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात येणार आहे.
सीपीडीकडून प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, १५ ते २० दिवसांत निविदा काढण्यात येईल, असे मध्यवर्ती खरेदी विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान या आहार पोषणात मांसाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहारात चार चपात्या, भात, डाळ, उसळ (सर्व रुग्णांसाठी आठवड्यातून दोनदा) ६० ग्रॅम कोंबडीचे मटण असलेला रस्सा देण्यात येणार आहे. शाकाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहार म्हणून पनीर देण्यात येणार आहे.