अलिबाग – अलिबाग मधील थेरोंडा गावातील खंडेराव पाड्यातील खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरल्या. या सर्व मूर्ती ५ किलो ३६० ग्रॅम वजनाच्या होत्या. येथील खंडोबाला पाचपाडे कोळीवाड्याचे कुलदैवत मानले जाते. ही घटना १७ मे रोजी घडली.
थेरोंडा खंडेरावपाडा येथील मंदिरातील लाकडी देव्हाऱ्यात पन्नास वर्षांपूर्वीच्या या मूर्ती होत्या. यात मल्हारी मार्तंड, म्हाळसा, भैरी देवी यांच्या चांदीच्या मोठ्या मूर्ती व काळभैरव देवाच्या सहा मूर्ती होत्या. या मूर्ती एकूण ३ किलो १६० ग्रॅम वजनाच्या होत्या. याचवेळी थेरोंड्यातील आगल्याचीवाडी येथील ढोलके कुटुंबीयांच्या एकविरा, म्हाळसा, खंडोबा, भैरी देवी यांच्या एकूण ९४० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती तसेच मुंबईकर कुटुंबीयांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या व एकवीरा देवीच्या एकूण १ किलो २६० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती चोरल्या. या सर्व मूर्तींना पाठीमागून तांब्याचा मुलामा व चांदीचा लोलक होता. या तीनही ठिकाणी मिळून तब्बल १ लाख ६० हजार ८०० रुपये रक्कमेची ५ किलो ३६० ग्रॅम चांदी चोरट्यांनी चोरली.