मुंबई – मुंबई महापालिकेने पावसाळ्याआधी ‘खड्डेमुक्त मुंबई’ची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पूर्व द्रुतगती मार्गासाठी ९० कोटी, पश्चिम द्रुतगती मार्गासाठी १४० कोटी आणि महापालिकेच्या २४ वॉर्डसाठी प्रत्येकी ४० लाख असा एकूण २४२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ठेकेदारांना खड्डे भरण्यासाठी ‘रिऍक्टिक्ह अस्फाल्ट’ आणि ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’ तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्याला दोन महिने शिल्लक राहिल्यामुळे महापालिकेने पावसाळापूर्व कामे करण्यासाठी वेग घेतला आहे. महापालिकेच्या अखत्यारित शहरामध्ये सुमारे दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. तर इतर प्राधिकरणांचेही शेकडो किलोमीटर रस्ते महापालिकेच्या हद्दीत आहेत. इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांसाठी पालिकेलाच जबाबदार धरण्यात येते. मात्र, यंदा पालिकेने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी घेतल्याने हे कामही पालिकाच करणार आहे.
रस्तेदुरुस्तीसाठी दरवर्षी प्रत्येक वॉर्डला दोन कोटींचा निधी दिला जात होता. मात्र, यावर्षी कंत्राटदारांच्या माध्यमातून दिसेल तिथे खड्डा बुजवण्याचे धोरण राबवण्यात येणार आहे. शिवाय रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी २४ वॉर्डना प्रत्येकी ५० लाखांचा निधी देण्यात येणार आहे. खड्डा बुजवल्यानंतर काही काळात त्याठिकाणी तसेच आजूबाजूला खड्डे तयार होतात. त्यामुळे खड्डा पडलेल्या जागेचा संपूर्ण ‘बॅड पॅच’ काढून महापालिका दुरुस्ती करीत आहे. तसेच रस्त्याची उखडलेली साईडपट्टी दुरुस्ती करण्याचे निर्देशही कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. यामध्ये भरपावसातही खड्डे बुजवता येणारे ‘रिऍक्टिक्ह अस्फाल्ट’ आणि अवघ्या सहा तासांत पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करता येण्यासाठी वापरले जाणारे ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’ तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
कांदिवली मध्ये ‘खड्डेभाई’चा बर्थडे साजरा
बड्डे आहे ‘खड्डेभाई’चा…अन् जल्लोष साऱ्या गावाचा असे काहीसे दृश्य मुंबईच्या कांदिवलीमध्ये दिसले. या परिसरातील रस्त्यावर अनेक दिवसांपासून असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचा वाढदिवस रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला. पालिकेकडे या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही खड्डे बुजवण्यात न आल्याने हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढण्यात आली. तसेच बँजोच्या तालात खड्ड्यांचे औक्षण करून केक कापण्यात आला. हा अनोखा वाढदिवस साजरा करून पालिकेचा निषेध करण्यात आला. दरम्यान, यानंतर तरी पालिकेला जाग येईल आणि येथील खड्डे बुजवले जातील,अशी आशा नागरिकांनी व्यक्ती केली.