नवी मुंबई – महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर विरोधकांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनतर शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत या प्रकरणी चौकशी समिती नेमली होती. मात्र खारघर दुर्घटनेला आता दीड महिना उलटूनही चौकशी समितीने अद्याप कोणताही अहवाल सादर केलेला नाही. आता अहवाल सादर करण्यासाठी समितीने एक महिन्याची मुदत मागितली आहे.
१६ एप्रिल रोजी खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघाताने १४ श्री सदस्यांना प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने २० एप्रिल रोजी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. पण तो अहवाल अजून तयार नसून आता आणखी एका महिन्याची मुदत समितीने मागितली आहे.