खेडमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी
बाॅम्ब सापडल्याने खळबळ

खेड: – रत्नागिरी जिल्ह्यात खेडमध्ये भरणे नाका येथील एका घरात ८३ गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी एका बसच्या टायरखाली गावठी बाँम्ब फुटला होता. त्याचा तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादवी कलम २८६ सह स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.खेड तालुक्यात वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरले जात असल्याची चर्चा सुरू होती.

भरणे येथील एका घरात शिकारीसाठी वापरण्यात येणारे घातक गावठी बॉम्ब असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री आंबवली मार्गावर असलेल्या कल्पेश जाधव यांच्या घरावर धाड टाकून घराची झडती घेतली असता त्याठिकाणी सुमारे ८३ गावठी बॉम्ब आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी कल्पेश जाधव याला रात्री चौकशीसाठी ताब्यात घेऊन येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई गुरूवारी सायंकाळी उशिरा खेड पोलिसांच्या पथकाने केली आहे. या बॉम्बचा वापर वन्य जीवांची शिकार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय असून, काही दिवसांपूर्वी खेड – पन्हाळेजे या एसटी बसच्या चाकाखाली असाच एक बॉम्ब फुटून मोठा आवाज झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सुरू असलेल्या पोलिस तपासात या साठ्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्या आधारे ही कारवाई केली गेल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी आणखी सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Scroll to Top