मुंबई –
मुंबई महापालिकेकडून यंदा गणपती मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गणेशोत्सव मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगवेगळे अर्ज करण्याची गरज लागणार नाही. विविध उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावेत आणि याबाबतची परवानगी प्रक्रिया आणखी सुलभ व्हावी, यासाठी ‘एक खिडकी’ योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ- २) रमाकांत बिरादार यांनी दिली.
गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावेत, यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. पोलीस, वाहतूक पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचे अर्जही याच संकेतस्थळावर मिळणार आहेत. ही मंडप परवानगी नि:शुल्क असेल. तथापि १,००० रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे अनिवार्य आहे. मंडळांना यंदाही या अर्जासोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. दरम्यान, मंडळांना मंडप उभारणी परवानगीबाबत काही अडचण आल्यास विभागातील सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे बिरादार यांनी सांगितले आहे.