गणेशोत्सवात फुले आणि मिठाईच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी

मुंबई- आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या मिठाई आणि फुलांसाठी अव्वाच्या सव्वा
दर आकारून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट केली जाते.या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात मिठाई आणि फुलांच्या दरावर नियंत्रण ठेवा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.नरेश दहिबावकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यावर्षी ७ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून १७ सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळा पार पडणार आहे.मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दोन लाखांहून अधिक घरगुती गणपती आहेत.वाढती महागाई लक्षात घेता गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात फुले आणि मिठाईचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा, जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर्वसामान्य गणेशभक्तांना दिलासा मिळेल.

दरम्यान,गणेशोत्सवाच्या काळात गुजरातवरून येणारा मावा हा दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकावर गाडय़ातून उतरवल्यावर फलाटावर काही काळ पडलेला असतो.स्थानकात असलेल्या घुशी उंदरांमुळे मिठाई खराब होण्याचा धोका असतो.त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने मावा, मिठाईची तपासणी करावी, अशी मागणीदेखील अ‍ॅड.दहिबावकर यांनी केली.