ठाणे
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाणे शहरातून एकूण १५०० बस मोफत सोडण्यात येणार आहेत.मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा चार शहरांसाठी १५०० बस सोडल्या जाणार आहे. याचा फायदा जवळपास ६३ हजार कोकणवासीयांना होणार आहे. यंदा मुंबईकरांसाठी ही सुविधा उपल्बध करुन देण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
म्हस्के म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन देतो. १७ सप्टेंबर रोजी या बस सोडण्यात येणार आहेत. बसच्या बुकिंगसाठी आधीच शाखांमध्ये नोंदणी करण्यात आली होती. नागरिकांना तिकिट देण्याचे
काम सुरु करण्यात आले आहे. केवळ कोकणातच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणीही जाण्यासाठी नागरिकांना या मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांसाठी ४५०, ठाणेकरांसाठी ५००, कल्याण डोंबिवलीकरांसाठी ५५० बस सोडल्या जाणार आहेत.