गायिका अलका याज्ञिकना दोन्ही कानांनी ऐकू येईना स्वतः इन्स्टाग्रामद्वारे दिली माहिती

मुंबई – सुमधूर आवाजाने नव्वदीच्या दशकात अनेक लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्‍या सिनेसृष्टीतील गायिका अलका याज्ञिक यांना श्रवणशक्ती संबंधित एका दुर्मिळ आजाराचे निदान झाले आहे. या आजारामुळे त्यांना दोन्ही कानांनी अचानक ऐकू येणे बंद झाल्याची माहिती त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट दिली. त्यांच्या या पोस्टने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
अलका यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हायरल अटॅकनंतर त्यांना हा त्रास झाला. एके दिवशी विमानातून बाहेर पडताना त्यांना जाणवले की, आपल्याला काहीच ऐकू येत नाही. अलका यांनी या दुर्मिळ आजाराबद्दल माहिती देताना चाहत्यांसह सहकलाकारांना मोठ्या आवाजातील संगीत ऐकण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. हेडफोनचा अधिक वापर नको, असाही सल्ला दिला. माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांनो. काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाईटमधून बाहेर पडत होते आणि मला अचानक जाणवले की मला काहीही ऐकू येत नाही. यानंतर मी कुठे गायब आहे, असे माझे हितचिंतक व मित्र विचारत होते. काही आठवड्यांत थोडी हिंमत एकवटल्यानंतर त्यांच्यासाठी मी या विषयावर बोलायचे ठरवले, असे अलका याज्ञिक यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये
लिहिले आहे. माझ्या डॉक्टरांनी सांगितले की, मला दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉस झाला आहे. हे एका व्हायरल अटॅकमुळे झाले आहे. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मला मोठा धक्का बसला आहे. मी ही घटना स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मी माझे आयुष्य पुन्हा रुळावर आणू शकेन आणि लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन अशी आशा बाळगते. या कठीण काळात तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे त्या शेवटी म्हणाल्या. 58 वर्षीय अलका याज्ञिक या लोकप्रिय भारतीय गायिका आहेत. चार दशकांहून अधिक काळांपासून त्या गाण्यांद्वारे लोकांचे मनोरंजन केले. ‘तू शायर है मैं तेरी शायरी’, ‘गली में आज चांद निकला’, ‘अगर तुम साथ हो’ ही त्यांची गाणी आजही प्रसिद्ध आहेत.

मोठ्या आवाजातील संगीत ऐकणे टाळा
मोठ्या आवाजातील संगीत ऐकणे टाळा, असा सल्ला अलका याज्ञिक यांनी त्यांच्या चाहत्यांसह इतर गायकांना दिला आहे. हेडफोन आणि मोठ्या आवाजातील संगीताबद्दल माझ्या चाहत्यांना आणि तरुण सहकार्‍यांना इशारा देऊ इच्छिते की, वेळीच काळजी घ्या. भविष्यात याबद्दल मी सविस्तर बोलेन. काही त्रास जाणवल्यास वेळीच उपचार करा, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top