गुजरातमधील कंपनीला इतकी सबसिडी कशी ?

बेंगळुरू – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या जनता दल सेक्युलरचे पोलाद व अवजड उद्योग मंत्री कुमार स्वामी यांनी सरकार स्थापन होताच पहिला झटका दिला आहे. गुजरातमधील एका परदेशी कंपनीला देण्यात आलेल्या मोठ्या आर्थिक सवलतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका अर्थाने मोदी सरकारने मागच्या काळात केलेल्या उधळपट्टीवरच त्यांनी निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजी या अमेरिकेतील कंपनीने गुजरामध्ये सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. अडीच अब्ज रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे देशात ५ हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. या कंपनीला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीवरच कुमारस्वामी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बेंगळुरु मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या कंपनीला सरकार जी सवलत देते त्याचा विचार करता शासन या कंपनीकडून निर्माण केल्या जाणाऱ्या एका रोजगारासाठी ३ कोटी २० लाख रुपये मोजत आहे. या कंपनीला देण्यात आलेली एकूण रक्कम ही या कंपनीच्या गुंतवणूकीच्या सत्तर टक्के एवढी आहे. मला या गोष्टीचे फार आश्चर्य वाटते की, एखाद्या कंपनीला इतक्या मोठ्या प्रमाणावर सवलत कशी काय दिली जाते? या उलट बेंगळुरु मध्ये पिन्या औद्योगिक वसाहतीत शेकडो लघु उद्योग आहेत. हे लघु उद्योग लाखो रोजगार निर्माण करत आहेत. त्यांना काय दिले जाते, याचा विचार करायला हवा. मला केवळ देशाची संपत्ती वाचवायची आहे. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मी रोजगार निर्मितीला अधिक प्राधान्य देणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top