- आता २५ मेची तारीख
मुंबई – १ मार्च २००२ मार्च रोजी गुजरातमधील गोध्रा जळीत कांडानंतर बडोदा येथे बेस्ट बेकरीच्या आवारात १४ जणांचे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. दोन आरोपींच्या कथित सहभागाबाबत मुंबई सत्र अंतिम निकाल देणार आहे. मात्र सत्र न्यायालय हे उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या इतर अन्य प्रकरणांच्या सुनावणीच्या कामात व्यग्र आहे. त्यामुळे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी बेस्ट बेकरी खटल्याची सुनावणी २५ मेपर्यंत पुढे ढकलली आहे.
बडोदा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीच्या आवारात संतप्त जमावाने हल्ला केला होता. गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या जमावामध्ये हर्षद सोलंकी आणि मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. सत्र न्यायालयात एकूण चार आरोपींविरुद्ध खटला दाखल झाला होता. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलंकी आणि गोहिल यांच्याविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले आहेत. सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने १७ जानेवारीला निकाल राखून ठेवला होता.मात्र उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या इतर प्रकरणांच्या सुनावणीमध्ये सत्र न्यायालय व्यग्र असल्याने बेस्ट बेकरी खटल्याचा निकाल लांबणीवर पडला आहे. आता घटनेच्या तब्बल २१ वर्षानंतर दोन आरोपींच्या सहभागाबाबत न्यायालय निकाल प्रतीक्षेत आहे.