नंदूरबार
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या नंदुरबार स्थानकावर खोळंबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
मध्य प्रदेश आणि सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. नर्मदा काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सरदार सरोवर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग होत असल्याने गुजरातमधील अंकलेश्वर – भरूच पुलावरील रेल्वे रुळावर पाणी आले. त्यामुळे गुजरातमध्ये जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या नंदुरबार रेल्वे स्थानकामध्ये खोळंबल्या. नर्मदा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यानंतरच या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. गुजरातच्या ताप्ती नदीत बांधलेल्या धरणाचे १५ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचा इशारा देण्यात आला आहे. आज रद्द झालेल्या गाड्यांमध्ये मुंबई-अहमदाबाद आणि मुंबई-गांधीनगर वंदे भारत, मुंबई – अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस, दादर- पोरबंदर, मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस,बांद्रा टर्मिनस-श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-स्वराज एक्सप्रेस, बांद्रा टी-अमृतसर एक्सप्रेसचा समावेश आहे.
गुजरातमध्ये नर्मदा नदीला पूर रेल्वे नंदुरबारमध्ये खोळंबल्या
