अहमदाबाद – आज गुजरात टायटन्सने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना लखनौ सुपर जायन्ट्सचा 56 धावांनी पराभव करून प्लेऑफ मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 227 धावांचा जो डोंगर उभा केला होता तो पार करणे लखनौला शक्य झाले नाही. लखनौच्या केवळ डिकॉक आणि मेयर्स या दोघांनीच गुजरातच्या गोलंदाजीचा यशस्वी मुकाबला केला तर इतरांना अपयश आले त्यामुळेच लखनौला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना वृद्धीमान साहा 81, शुभमन गिल नाबाद 94, कर्णधार पंड्या 25 आणि मिलर 21 यांच्या फलंदजीच्या जोरावर 20 षटकांत 227 धावांचा डोंगर उभा केला होता. गुजरातने दिलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली. काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक यांनी 88 धावांची सलामी दिली. या जोडीने पावरप्लेमध्ये 72 धावांचा पाऊस पाडला होता. मोहित शर्माने ही जोडी फोडत लखनौला मोठा धक्का दिला.
मोहित शर्माने 48 धावांवर काइल मेयर्स याला बाद केले. या विकेटनंतर लखनौचा डाव गडगडला. काइल मेयर्सने 32 चेंडूत 48 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले आहेत. तर क्विंटन डिकॉक याने 70 धावांची खेळी केली. या खेळीत क्विंटन डिकॉक याने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने 70 धावांचा पाऊस पाडला. क्विंटन डिकॉक आणि काइल मेयर्स यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. एकही फलंदाजाला तीस धावा करता आल्या नाही. दिपक हुड्डा 11, मार्कस स्टॉयनिस 4, निकोलस पूरन 3, आयुष बडोनी 21 धावांवर बाद झाले. कर्णधार कृणाल पांड्याला खातेही उघडता आले नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. सुरुवातीला गुजरातच्या गोलंदाजांना लय मिळाली नाही. लखनौच्या सलामी जोडीने गुजरातची गोलंदाजी फोडून काढली होती. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातच्या गोलदांजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. ठरावीक अंतरावर विकेट घेतल्या. मोहित शर्माने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहित शर्माने चार षटकात फक्त 29 धावा खर्च केल्या. नूर अहमद, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक -एक
विकेट मिळाली.
गुजरातच्या या विजयामुळे त्यांचे 16 पॉईंट झाले असून त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित झालेला आहे.
गुजरात टायटन्सचा लखनौवर 56 धावांनी विजय
