गेले महिनाभर जे घडणार अशी कुजबुज होती ते घडलेच कोल्हापुरात दंगल! पोलिसांनी आक्षेपार्ह व्हिडिओंकडे मुद्दाम दुर्लक्ष केले?

कोल्हापूर – महाराष्ट्रात धार्मिक द्वेषाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच शाहू महाराजांचे कोल्हापूरही या वणव्यात सापडले. गेले महिनाभर विविध भडकावू व्हॉटस्अ‍ॅप आणि पोस्टमुळे वातावरणात असा काही तणाव निर्माण झाला होता की, कोल्हापुरातील आमदारांपासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला माहीत होते की, कोल्हापुरात काहीतरी घडणार आहे. पोलीस मात्र आश्‍चर्यकारकरित्या शांत होते. त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले अशीच चर्चा आहे. याच वातावरणात आज ठिणगी पडली आणि कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. या घटनांच्या मूळ सूत्रधाराचा शोध कधीही लागणार नाही हे निवडणूक राजकारणातील उघड सत्य आहे.
गेले महिनाभर हिंदूंच्या भावना भडकवणार्‍या पोस्ट आणि व्हॉटस्अ‍ॅप फिरत होते. छोटे मोठे खटकेही उडत होते. पण पोलिसांनी याचा कोणताही तपास केला नाही. काल शिवराज्याभिषेक दिनी काही तरुणांनी ‘बाप तो आखिर बाप है’ असे लिहित औरंगजेब आणि टीपू सुलतान यांचे फोटो पोस्ट केले. याने भडका उडाला आणि आज सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येत शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलकांच्या भोवती पोलिसांनी कडे केले होते. मात्र आंदोलकांनी अचानक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे वातावरण चिघळले.
शिवाजी चौकापासून जवळच असलेल्या माळकर तिकटी, महाद्वार रोड, बारा इमाम, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेक झाली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे पाहताच पोलिसांनी अश्रूधूर सोडला आणि लाठीमार करून लोकांना पांगवण्यास सुरुवात केली. लाठीचार्ज सुरू होताच ते सैरावैरा पळू लागले, दुकानांमध्ये, गल्लीबोळांत घुसू लागले. पोलीसही मागे धावत होते. दुपारी साडेबारापर्यंत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, त्यानंतर दबा धरून बसलेले तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर आल्याने पोलिसांना पुन्हा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दोन अडीच तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तोपर्यंत काही दुकानांचे पत्रे तोडले गेले होते. काही गाड्यांची नासधूस झाली होती. काहीजण दगडफेकीत जखमी झाले. पोलिसांनी यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर फिरवणार्‍या सात तरुणांना अटक केली होती. 16 ते 18 वर्षे वयाची ही मुले आहेत. शिवाय जमावबंदीचा आदेशही होता. तरीही वातावरण बिघडले. त्यानंतर पोलिसांनी इंटरनेट बंद केले. जमावबंदी 19 जूनपर्यंत लागू केली. शेवटी दुपारनंतर परिस्थिती आटोक्यात आली. पण तरीही तणाव कायम आहे. कोल्हापुरातील सर्व दुकाने दिवसभर बंद राहिली.
दरम्यान, कोल्हापुरात काहीतरी घडणार असे गेल्या महिनाभरापासून सतेज पाटील व अन्य आमदार सांगत आहेत. पोलीस अधीक्षक बलकावडे यांचा दोन्ही धर्मांच्या संघटनांशी सलोखा होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. मात्र चारच दिवसांपूर्वी बलकावडे यांची बदली होऊन त्यांचा भार महेंद्र पंडित यांनी स्वीकारला. त्यांना मात्र परिस्थिती हाताळता आली नाही. आज दंगलीनंतर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी माहिती दिली की, ‘जे कोणी घराबाहेर पडून अनावश्यक उपद्रव करतील त्यांना आम्ही ताब्यात घेऊ. झालेल्या नुकसानांचे पंचनामे, गुन्हे दाखल करणे वगैरे काम सुरू आहे. काही गाड्यांचे नुकसान झाले. जमावावर नियंत्रण ठेवले होते, पण अचानक एवढ्या मोठ्या संख्येने आणखी लोक कुठून आले त्याची माहिती घेण्यात येईल.’ आक्षेपार्ह स्टेट्स ठेवणार्‍यांपैकी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली. मात्र, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोणताही आकडा सांगितला नाही.
या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटले. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणी अधिक खोलात जावे लागेल, असा इशारा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले, अचानक औरंग्याच्या एवढ्या औलादी महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या. याच्यामागे कोण हे देखील पाहावे लागेल. जाणीवपूर्वक या औलादी कोणी पैदा केल्या का, हे देखील पहावे लागेल. समाजात यामुळे तणाव निर्माण होत आहे. कोण जाणूनबुजून महाराष्ट्राचे नाव खराब व्हावे, यासाठी काम करत आहे हे शोधून काढू. औरंगजेबाचं उदात्तीकरण येथे खपवून घेणार नाही. मात्र कायदा हातात घेतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोच. शिवाय महाराष्ट्राच्या लौकीकावरही डाग लागतो. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले की, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी सरकारची तसेच नागरिकांनीही शांतता राखावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणार्‍याला पाठीशी घातले जाणार नाही.
शरद पवारांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ‘काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. राज्य सरकारने पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करावी, त्याऐवजी धार्मिक मुद्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. तसेच कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. अशा घटनांना सत्ताधारी पक्ष प्रोत्साहित करत आहेत.’
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात दंगली घडवून आणण्याचा डाव आहे, हे तपासावे लागेल. या घटनेमागे कोण मास्टर माईंड याचा शोध घेतला पाहिजे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करू नका, पोलिसांना कारवाईची मोकळीक देण्यात यावी, आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्याची सखोल चौकशी व्हावी. संबंधित कोणत्याही राजकीय पक्षाचा असेल तरी त्याच्यावर कठोर कारवाई होणे
गरजेचे आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, ‘याच मातीत औरंगजेबाला गाडले. त्यामुळे औरंगजेबाचे कोणी भक्त असतील आणि त्याचे फोटो दाखवत असतील तर त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी पाकिस्तानात जावे. हीच बाळासाहेबांची भूमिका होती आणि आमचीही आहे.’ शिवसेना नेते अनिल परब म्हणाले, ‘या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे व्हायला हवी. यामागचे सूत्रधार शोधायला हवेत. याला कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का हे शोधायला हवे. पोलिसांनी आपले काम चोख केले पाहिजे. कोणाच्याही दबावाला बळी पडायला नको.’ दोन्ही समाजांना एकत्र बोलावून चर्चा करून शांततेचे आवाहन करायला हवे होते, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top