मुंबई – मुंबई उपनगरातील वाहनांची रखडपट्टी दूर करण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड असा प्रकल्प मुंबई महापालिका राबवित आहे. यामध्ये मुलुंड ते खिंडीपाडा दोन समांतर भूमिगत बोगदे बांधले जाणार आहेत.मात्र या कामांतील कास्टिंग यार्डसाठीच १३२ कोटींचा अतिरिक्त खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा विविध करांसह खर्च १२ हजार १३ कोटी इतका असून त्यात आता या अतिरिक्त खर्चाची भर पडणार आहे.
मुंबई महापालिका पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगावमधील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत दोन समांतर भूमिगत बोगदे जाणार आहेत.त्यांची लांबी ४.७० किलोमीटर इतकी असणार आहे.या प्रकल्पासाठी विविध करांसह १२ हजार १३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड अँड नागार्जुन कस्ट्रक्शन कंपनी संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे; मात्र या कामामध्ये कास्टिंग यार्डसाठी १३२ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. आरेच्या जंगलातून हे बोगदे जात असल्याने याचे कास्टिंग यार्ड २५ किलोमीटर लांब निश्चित केले आहे.त्यामुळे प्रकल्पाचा खर्च विविध करांसह १३२ कोटी रुपयांनी वाढला आहे.