पणजी – गोवा वेधशाळेने राज्यात सोमवार ८ व मंगळवार ९ मे रोजी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दोन दिवसांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांमुळे गडगडाट करत पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती सावधगिरी बाळगण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. तसेच पुढील चार-पाच दिवसांत तापमानात मोठे बदल घडणार नाहीत. मात्र, १० मे नंतर राज्यातील हवामान कोरडे राहील. शनिवारी पणजी येथे कमाल ३४.६ तर किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती .