मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी होतात. अशा गोविंदांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत म्हणून विम्याचे कवच मिळावे, ही मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती. ती मान्य करून प्रत्येक गोविंदांना १० लाखापर्यंत विम्याचे संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनात राज्यातील सुमारे दीड लाख गोविंदांना विम्याचे कवच मिळावे आणि स्पेनमध्ये होणाऱ्या मानवी मनोरे स्पर्धेमध्ये भारताच्या ६० गोविंदांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आमदार सरनाईक यांनी पत्र लिहिले होते. या पत्रावर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
मागील वर्षी ७५ हजार गोविंदांना शासनाच्या वतीने विम्याचे कवच देण्यात आले होते. त्यावेळी अनेक गोविंदा विम्यापासून वंचित राहिले होते. त्यांना विमा मिळाला नव्हता. यावर्षी गोविंदाची संख्याही वाढली आहे. दहीहंडी उत्सवात गोविंदा जायबंदी होतात, तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मंडळाची आर्थिक परिस्थिती नसते. पैशांअभावी गोविंदावर योग्य उपचार होऊ शकत नाही. म्हणून यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन दीड लाख गोविंदांना विमा कवच द्यावे, अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी केली होती.
