पणजी: गोव्यात दरवर्षी ४० ते ४२ लाख पर्यटक येतात. त्यांच्या सोयीसाठी गोवा सरकारने ‘गोवा टॅक्सी अॅप’ सुरू केले असून, या अॅपचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज पणजीत करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, यापूर्वी गोवा माईल्स हे खाजगी टॅक्सी अॅप गोव्यात टॅक्सीस सेवेसाठी उपलब्ध केले होते. मात्र आता गोवा सरकारने राज्यात येणार्या पर्यटकाना दर्जेदार व सुरक्षित टॅक्सी सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हे अॅप सुरू केले आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोव्याचा विकास करताना टॅक्सीसेवेतही नवे तंत्रज्ञान वापरणे गरजेचे ठरते. त्यानुसार हे अॅप सुरू केले गेले आहे. या अॅपला गोव्यातील ५०० टॅक्सी चालक आतापर्यंत संलग्न झाले आहेत. गोव्यात दर्जेदार पर्यटक यावेत आणि त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.