पणजी – कर्नाटकच्या बेळगावातील एका २५ वर्षीय ‘ब्रेन डेड ‘ झालेल्या अपघातग्रस्त तरुणामुळे चार रुग्णांना जीवदान मिळाले. या तरुणाचे हृदय,यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडांचे गोवा,चेन्नई आणि दिल्लीतील एकजण अशा चौघांवर प्रत्यारोपण करण्यात आले.
१३ सप्टेंबर रोजी या ‘ब्रेन डेड ‘ तरुणाचा गोव्यात अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर गोव्यात उपचार सुरू होते.त्यावेळी डॉक्टरांच्या पथकाने त्याला ‘ब्रेन डेड’ घोषित केले.कारण त्याच्या मेंदूने काम करणे थांबवले होते.त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे एक मूत्रपिंड गोव्यात डायलिसिसवर असलेल्या ३१ वर्षीय व्यक्तीला तर दुसरे मूत्रपिंड हेल्थवे येथील ४५ वर्षीय रुग्णाला देण्यात आले.त्यानंतर त्याचे हृदय चेन्नईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला आणि यकृत दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले,अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
रोटो-गोवा अंतर्गत गोव्यातील हा चौथा अवयवदान कार्यक्रम आहे. राज्यात किडनी प्रत्यारोपणाची सुविधा आहे. परंतु, हृदय आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा नाही. त्यामुळे संबंधित तरुणाचे हृदय आणि यकृत राज्याबाहेर पाठवण्यात आले.त्यासाठी गोव्यातील डॉक्टरांनी पोलिसांच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडोर तयार केला होता.