ग्रेसमार्क मिळालेल्यांची नीटची फेरपरीक्षा होणार

नवी दिल्ली – नीट परीक्षेच्या निकालाबाबत गोंधळ सुरू होऊन हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने ही परीक्षा घेणार्‍या एनटीएला उत्तर देण्यास सांगितले. आज एनटीएने न्यायालयात ग्रेसमार्क दिल्याचे मान्य केले. यानंतर न्यायालयाने निकाल देत ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले आहेत अशा 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा दिली आणि 23 जूनला परीक्षा घेतली जाईल असेही सांगितले.
नीट परीक्षेबाबत दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावरून विद्यार्थी आंदोलन करीत पुन्हा फेरपरीक्षा घेण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. नीट परीक्षेत दिले गेलेले ग्रेसमार्क आणि पेपरफुटी हे दोन वादाचे विषय आहेत. ग्रेसमार्क देणार आहेत आणि ग्रेसमार्क दिले आहेत या दोन्ही गोष्टी एनटीएने आतापर्यंत जाहीर केल्या नव्हत्या.
याबाबत आरडाओरड झाल्यावरही एनटीए ग्रेसमार्क दिल्याचे मान्य करीत नव्हती. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि आज पहिल्याच सुनावणीत एनटीएने ग्रेसमार्क दिल्याचे मान्य करीत फेरपरीक्षा घेण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, ज्या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क दिले ते मार्क रद्द करून गुण ठरविले जातील. ज्यांना हे मान्य नाही त्या ग्रेसमार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल. ही परीक्षा 23 जूनला घेऊन 30 जूनपूर्वी निकाल देऊन 6 जुलैला समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल. नीट परीक्षेच्या बाबतीत इतर विषयांवर 8 जुलैला सुनावणी
होणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला असला तरी बहुसंख्य विद्यार्थी आणि याचिकाकर्ते अलख पांडे या निर्णयावर समाधानी नाहीत, विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की न्यायालय पेपर फुटीबाबत काहीच बोलले नाही. बिहार आणि गुजरातमध्ये पेपर फुटले. ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पण हे दडपून टाकण्यासाठी एनटीएने फेरपरीक्षेचा प्रस्ताव दिला, पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी एनटीएने समिती नेमली आहे, पण त्यांचेच सभासद पेपरफुटीत गुंतलेले असताना त्याच सभासदांची समिती नेमून काय होणार आहे. याचिकाकर्ते अलक पांडे म्हणाले की, सीबीआयने एनटीएच्या कारभाराची चौकशी केली पाहिजे, ग्रेसमार्क दिले हे एनटीएने सांगितलेही नव्हते, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, आम्ही सर्वोच्च न्यायालयात पोहोचलो, त्यानंतर ते मान्य करतात. त्यांच्या कार्याबाबत चौकशी झालीच पाहिजे.

परीक्षा पे चर्चा
निकालावर का नाही

एका विद्यार्थ्याने म्हटले की, या आंदोलनात आम्ही सतत केंद्रीय शिक्षण मंत्री, सरकार आणि पंतप्रधानांना टॅग करीत आहोत. पण तिघेही प्रतिक्रिया देत नाहीत, पंतप्रधानांनी यात लक्ष घालायला हवे. ते परीक्षा पे चर्चा करतात, मग निकालावर चर्चा का
करीत नाहीत?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top