नवी दिल्ली- सध्या विविध राज्यांमध्ये भूकंपाच्या घटना घडत आहेत. अशातच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे कुठलेही नुकसान झालेले नाही.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सकाळी १०: ३१ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. ग्वाल्हेरच्या आग्नेय दिशेला २८ किलोमीटर दूर आणि १० किलोमीटर खोल अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. दरम्यान, छत्तीसगडच्या अंबिकापूर व आसपासच्या अन्य शहरात देखील सकाळी १०.३९ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र सुरजपूरमधील भटगांव येथे होते. तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपाबरोबरच भारतातही भूकंप होईल अशी भविष्यवाणी फ्रँक होगरबीट्स या डच संशोधकाने केली होती. त्यानुसार, नुकतेच दिल्लीसह इतर परिसरात शुक्रवारी भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. त्यानंतर आज ग्वाल्हेर येथे भूकंपाचे धक्के बसल्याने या भविष्यवाणीची सर्वत्र चर्चा होत आहे.