कॅनबेरा :
मिस युनिव्हर्स २०२२ फायनलिस्ट आणि ऑस्ट्रेलियन फॅशन मॉडेल असलेली सिएना वेअर हिचे वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. ऑस्ट्रेलियात घोडेस्वारी करताना सिएनाचा अपघाता झाला होता त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.
सिएनाच्या मॉडेलिंग एजन्सी स्कूप मॅनेजमेंटने तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. २ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात सिएना घोडेस्वारीचा आनंद घेत होती. मात्र अचानक ती घोड्यावरुन खाली पडली त्यावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अनेक दिवसांपासून उपचारही सुरु होते. मात्र त्या दरम्यानच तिला मृत्यूने घेरले. दरम्यान, मिस युनिव्हर्स २०२२ या स्पर्धेत सिएनाने तिच्या सौदर्याचे प्रदर्शन केले होते. या स्पर्धेत शेवटच्या भागात पोहचली होती. ब्यूटी क्वीनने सिडनी विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि मानसशास्त्रात दुहेरी पदवी प्राप्त केली होती आणि तिने केवळ तीन वर्षांची असताना घोडेस्वारी सुरू केली होती. तिच्या मृत्यूनंतर, तिच्यासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये काम करणारा ऑस्ट्रेलियन छायाचित्रकार ख्रिस ड्वायर याने देखील मॉडेल सिएना वेअरला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली.