नवी दिल्ली – भारताने चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर आदित्य एल-१ हे यान सूर्यावर पाठवले. या दोन्ही मोहिमांनंतर आता समुद्राच्या पोटात दडलेली रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. यासाठी भारताने समुद्रयान मोहीम आखली असून या मोहिमेअंतर्गत मत्स्य ६००० या स्वदेशी बनावटीच्या सबमर्सिबलमधून (मोठ्या जहाजाच्या आधारे खोल पाण्यात जाणारी पाणीबुडी) नाविकांना समुद्रात सहा किलोमीटर खोलवर पाठवण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून या ‘मत्स्य’ ६००० सबमर्सिबलची बांधणी सुरू असून बंगालच्या उपसागरात २०२४ च्या सुरुवातीला ‘मत्स्य’ ६००० च्या चाचण्या सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी मानव वाहून नेणार्या मत्स्य ६००० सबमर्सिबलची पाहणी केली. या प्रकल्पामुळे सागरीक्षेत्राला कोणतीही हानी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समुद्रातील धातू आणि विशेषतः कोबाल्ट, मँगनीज आणि निकेलसारख्या खनिजांचा शोध घेणे हा समुद्रयान मोहिमेचा उद्देश आहे.
चांद्र-सूर्ययानानंतर भारताचे आता समुद्रयान
