‘चाय पे चर्चा’नंतर लोकसभेसाठी भाजपच्या टिफिन बैठका

नवी दिल्ली – भाजपने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा एक आगळावेगळा प्रयोग राबवणार आहे. या उपक्रमाला भाजपने टिफिन बैठक असे नाव दिले असून कालपासून याची सुरुवात करण्यात आली. भाजपच्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीची मोहीम राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोठ्या जाहीर सभेने सुरू झाली असून ही मोहीम जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत मोदी सरकारची ९ वर्षांतील कामगिरी देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप काम करणार आहे.
तसेच, या मोहिमेद्वारे काही कारणास्तव सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्यांना भाजपशी जोडण्याचा भाजपचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी काही अनोखे प्रयोगही या मोहिमेत नाराज कार्यकर्ते व नेत्यांचे मन वळवून त्यांना पुन्हा सक्रिय करण्यात येणार आहे. या अभिनव प्रयोगाला ‘टिफिन बैठक’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आज आग्रा येथून पहिल्या टिफिन बैठकीचे उद्घाटन केले. भाजपच्या देशातील प्रत्येक आमदार आणि खासदाराला या टिफिन बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, तरुण चुग आणि विनोद तावडे यांना या मोहिमेचे प्रभारी बनवण्यात आले आहे. विधानसभा स्तरावर या बैठका होणार आहेत. यामध्ये आमदार, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते,विविध संघटनांचे आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे या सभेला उपस्थितांना आपापल्या घरून स्वतःचा टिफीन आणावा लागेल. सर्वजण एकत्र जेवण घेऊन चर्चा करतील. यादरम्यान लोकांच्या तक्रारी दूर करून आमदार, खासदार आपले कर्तृत्व सर्वांसमोर मांडतील. यामुळे नाराज कार्यकर्त्यांना सक्रिय करता येणार असून प्रत्येक बैठकीची माहिती व अभिप्राय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. याच्या मुल्यांकनाच्या आधारे भाजप पुढील निवडणुकीच्या रणनीतीला चालना देईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top