चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान
अमिताभ बच्चन जखमी

मुंबई : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांच्या उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगदरम्यान अॅक्शन सीन शूट केला जात होता. त्यादरम्यान अमिताभ हे जखमी झाले.

शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईला हलवण्यात आले. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी बिग बींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

बिग बींनी ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘हैदराबादमध्ये शुटिंग सुरु होती, तेव्हा ॲक्शन सीन शुट करत असताना मी जखमी झालो आहे. अपघातानंतर शुटिंग रद्द करण्यात आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयातील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले आहे. आता मी घरी परतलो आहे. आता काळजी करण्याचे कारण नाही. हालचाल आणि श्वासोच्छवास घेताना त्रास होत आहे. पूर्ण बरे व्हायला काही आठवडे लागतील. वेदना होत आहेत, त्यासाठी काही औषधे देखील घेत आहे. अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची बातमी ऐकताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पण खुद्द बिग बींनी काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले आहे.

Scroll to Top