मुंबई – ‘ मराठी पाऊल पडते पुढे ‘ या उद्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार्या चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे आज पहाटे चेंबूरच्या घाटले गाव येथे राहत्या घरी निधन झाले. ते अवघ्या ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट उद्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
स्वप्नील मयेकर हे घाटले गाव म्युनिसिपल शाळेजवळच्या माता प्रसाद बिल्डिंगमध्ये राहत होते. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते मयेकर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. स्वप्नील यांनी ‘हा खेळ संचितांचा’ या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटात अभिनेता चिराग पाटील आणि अभिनेत्री सिद्धी पाटणे, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, अभिनेते सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. मयेकर यांनी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.