बीजिंग : हिंद महासागराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी लू पेंग युआन यू ०२८ हे चिनी मासेमारी जहाज हिंद महासागरात उलटल्याने ३९ जण बेपत्ता झाले आहेत. या बोटीत १७ चिनी क्रू सदस्यांव्यतिरिक्त १७ इंडोनेशियन आणि पाच फिलिपिनो नागरिक होते. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरू असून, अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तातडीने बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी चीनचे कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालय, चीनचे वाहतूक मंत्रालय आणि शेडोंग प्रांताला परिस्थितीची तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले. जिनपिंग यांनी आंतरराष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव पथकांचीही मदत घेतली आहे. शोध आणि बचाव कार्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातील संबंधित दूतावासांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच चिनी सागरी शोध आणि बचाव केंद्रानेही संबंधित देशांना माहिती दिली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांचे बचाव पथकाकडूनही बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शोध आणि बचाव कार्यसाठी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्समधील दूतावासांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. चिनी बोटीमध्ये १७ चायनीज क्रू मेंबर्स व्यतिरिक्त १७ इंडोनेशियन आणि पाच फिलिपिनो प्रवासी होते.