बीजिंग- चीनमध्ये कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. एप्रिलपासून कोविड रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, दर आठवड्याला सहा कोटींहून अधिक जणांना कोविडची लागण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण यावेळी चिनी सरकारने जनजीवन सामान्य ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे लॉकडाऊन होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान आणि जनक्षोभ लक्षात घेऊन चीनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झीरो कोविड धोरण अचानक मागे घेतले. मात्र आता सहा महिन्यांनी कोविड संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने पसरत आहे. चीनमधील प्रसिद्ध डॉ. झोंग नानशान यांनी अंदाज व्यक्त केला की, जूनअखेरीपर्यंत दर आठवड्याला 6 कोटी 50 लाख लोकांना कोविडची लागण होऊ शकते. यापूर्वी त्यांनी दर आठवड्याला चार कोटी संसर्ग होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
शांघायच्या हुआशान हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग केंद्राचे संचालक डॉ. झांग वेनहोंग यांनी सांगितले आहे की, अलीकडे संसर्ग झालेल्या तीन चतुर्थांश लोकांना कोविडच्या पहिल्या लाटेत लागण झाली नव्हती. मात्र, रुग्णांत वाढ होऊनही आर्थिक उलाढाल व जनजीवनावर फारसा परिणाम होणार नाही.
हाँगकाँग विद्यापीठातील विषाणूशास्त्राचे प्राध्यापक डोंग यान जिन म्हणतात की, सध्या संसर्ग होत असलेले लोक वृद्ध किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असू शकतात. गेल्या या महामारीतून ते वाचले, पण आता सतर्क न राहिल्याने या लोकांना जास्त धोका आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेवेळी संपूर्ण चीनमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती, पण यावेळी चिनी सरकारने जनजीवन सामान्य ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही
