चीनमध्ये रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू

बीजिंग – चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीत २१ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. आगीतून जीव वाचवण्यासाठी अनेकांनी हॉस्पिटलच्या उंच इमारतीच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या तर काही जण एसीच्या आउटडोरअ युनिटवर बसलेले दिसून आले. बिजिंगमध्ये चांगफेंक हे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या पूर्वेकडील भागाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. यानंतर हॉस्पिटलच्या वार्डांमध्ये सर्व धूरच धूर पसरला. आगीमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काही जणांचा जीव गुदमरला तर काही जण आगीत होरपळले. एकूण २१ जणांचा या घटनेत मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top