लष्कराच्या तोफखाना पलटणीत केली नियुक्ती
नवी दिल्ली-भारतीय लष्कराच्या इतिहासात तोफखान्याच्या पलटणीमध्ये पहिल्यांदाच ५ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या महिला आता चीन-पाकिस्तान सीमेवर शत्रूवर तोफगोळे आणि रॉकेट डागणार आहेत.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींना संधी दिल्यावर आता भारतीय लष्कराच्या अत्यंत जोखमीच्या या इतिहासात पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या महिला आता शत्रूवर तोफगोळे आणि रॉकेट डागणार आहेत.
भारतीय लष्कराची प्रमुख शाखा असलेल्या आर्टिलरी रेजिमेंटमध्ये २९ एप्रिल रोजी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून या पाच महिला अधिकारी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या आहेत. लेफ्टनंट मेहक सैनी, लेफ्टनंट साक्षी दुबे, लेफ्टनंट अदिती यादव, लेफ्टनंट पायस मुदगील आणि लेफ्टनंट आकांक्षा अशी या पाच जिगरबाज महिला अधिकाऱ्यांची नावे आहेत.
या तरुण महिला अधिकाऱ्यांची सर्व प्रकारच्या तोफखाना युनिटमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. यात त्यांच्यावर रॉकेट, तोफगोळे डागणे,मध्यम क्षेत्र आणि शत्रूवर पाळत ठेवून त्यांच्या लष्करी ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर हल्ला करणे या सारख्या आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या या पाच महिला अधिकारी पार पडणार आहेत.उत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या युनिट्समध्ये आणि इतर दोन रेजिमेंटमध्ये त्यांना तैनात करण्यात येणार आहे.त्यांच्या या नियुक्ती समारंभाला लेफ्टनंट जनरल अदोष कुमार, कर्नल कमांडंट आणि तोफखाना संचालक (नियुक्त) यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.