चॅटजीपीटी खोटेही बोलते? परत परीक्षा घेणार

टेक्सास- अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील एका प्राध्यापकाने विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध खरेच त्यांनी लिहिलेले आहेत का, हे तपासण्यासाठी चॅटजीपीटीचा या एआय टूलचा वापर केला. या टूलनी हे निबंध संगणकाद्वारे लिहिलेले असल्याचे खोटे सांगितल्यानंतर प्राध्यापकाने संपूर्ण वर्गाला अनुत्तीर्ण केले. मात्र, चॅटजीपीटीची ही माहिती खोटी असल्याचे लक्षात आल्यावर या प्राध्यापक महाशयांनी विद्यार्थ्यांची माफी मागत त्यांना पुन्हा परीक्षा घेण्याची संधी देण्याचे मान्य केले.
रेडिट थ्रेडने या प्रकाराची माहिती उघड केली आहे. टेक्सास विद्यापीठातील या प्राध्यापकाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. ते साहित्यचौर्य तपासण्यासाठी चॅटजीपीटी नावाचे साधन वापरत होते. चॅटजीपीटी हे ओपनएआयने विकसित केलेले एक भाषा मॉडेल चॅटबॉट आहे. ते मजकूर तयार करू शकते, भाषांतर करू शकते, विविध प्रकारची सर्जनशील साहित्य प्रसवू शकते आणि आपल्या प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तरे देऊ शकते.
प्राध्यापकाने विद्यार्थ्यांनी त्याच्या अंतिम परीक्षेसाठी सादर केलेले निबंध स्कॅन करण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला. चॅटजीपीटीने निबंध संगणकाद्वारे लिहिलेले असण्याची पूरेपूर शक्यता वर्तवली. त्यावर विश्वास ठेवून प्राध्यापकाने संपूर्ण वर्गाला अनुत्तीर्ण केले. त्यानंतर चॅटजीपीटीने चुकीची माहिती दिल्याचे उघड झाले. निबंध संगणकाने लिहिलेले नव्हते, तर ते विद्यार्थ्यांनी स्वतःच लिहिले असल्याचे आढळले. हे लक्षात आल्यानंतर प्राध्यापकाने विद्यार्थ्यांची माफी मागितली असून त्यांना परीक्षेची दुसरी संधी देण्याचे मान्य केले. या घटनेतून वाड्मयचौर्य शोधण्यासाठी एआय साधनांचा वापर कसा फसगत करणारा ठरू शकतो, हे सिद्ध झाले आहे. एआय टूल्स परिपूर्ण नसतात आणि तीही कधीकधी चुका करू शकतात. त्यामुळे त्यांचा सावधगिरीने वापर करणे आणि त्यांच्या मर्यादांची जाणीव असणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top