रायपूर – छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 10 जवान शहीद झाले, तर एक नागरिक (वाहनचालक) मृत्युमुखी पडला. आज दुपारी ही घटना घडली. यापूर्वी एप्रिल 2010 मध्ये दंतेवाड्यातच माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 76 पोलीस शहीद झाले होते. तो आतापर्यंतचा मोठा हल्ला मानला जातो.
बुधवारी शहीद झालेले सर्व जवान डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड) चे जवान होते. सर्च ऑपरेशननंतर ते अरणपूर येथे जात असताना नक्षलवाद्यांनी हा आयईडी स्फोट केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, माओवादी केडर लपून बसल्याची सूचना मिळताच डीआरजी जवान सर्च ऑपरेशनसाठी दंतेवाडाकडे रवाना झाले होते. तेथून शोधमोहिमेनंतर ते परतत होते. त्यावेळी अरणपूर मार्गावर पालनार येथे हा स्फोट झाला. हे सर्व जवान खासगी वाहनाने येत होते. या हल्ल्यात एक वाहनचालकही मृत्युमुखी पडला. हल्ल्यानंतर उत्तरादाखल कारवाई करण्यात आली, त्यात काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती आहे. जवानांचे वाहनही या हल्ल्यात जळून खाक झाले. हल्ला झालेले क्षेत्र राज्याची राजधानी रायपूरहून सुमारे 450 किलोमीटर दूर आहे.
खासगी वाहनातून 25 ते 30 जवान प्रवास करत होते. जखमी जवानांना आणण्यासाठी चार रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरातली गस्तही वाढवण्यात आली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये तीन हेड कॉन्स्टेबल रँकचे, चार कॉन्स्टेबल रँकचे जवान तर तीन शिपाई आहेत. शहिदांची नावे अशी – हेड कॉन्स्टेबल जोगा सोढ़ी, हेड कॉन्स्टेबल मुन्ना राम कडती, हेड कॉन्स्टेबल संतोष तामो, कॉन्स्टेबल दुल्गो मंडावी, कॉन्स्टेबल लखमू मरकाम, कॉन्स्टेबल जोगा कवासी, कॉन्स्टेबल हरिराम मंडावी, सैनिक राम करतम, सैनिक जयराम पोडियम, सैनिक जगदीश कवासी. खासगी वाहन चालकाचे नाव धनीराम यादव आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शहीद जवानांसाठी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, जवानांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. नक्षलवाद्यांना आम्ही सोडणार नाही. योजनाबद्ध रीतीने नक्षलवाद मुळापासून
उपटून टाकू. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या नक्षली हल्ल्यासंबंधी मुख्यमंत्री बघेल यांच्याशी चर्चा केली आणि सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनीही हा भेकड हल्ला असल्याचे म्हणत या हल्ल्याचा निषेध केला.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या स्फोटात दहा जवान शहीद, एका चालकाचा मृत्यू
