जगातील महान हिंदू पंतप्रधान असूनही
हिंदू आक्रोश मोर्चे का काढावे लागत आहेत?

छत्रपती संभाजीनगर- आज मविआची रेकॉर्डब्रेक स्पर्धा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी सवाल केला की, जगातील सर्वात महान आपला हिंदू पंतप्रधान असूनही हिंदू आक्रोश मोर्चे का काढावे लागत आहेत? तुम्ही म्हणाल ते देशद्रोही अशी मस्ती असेल तर वज्रमूठ करून ही मस्ती उतरवावीच लागेल. अजित पवारांनीही वज्रमूठ राखून भाजपा-शिवसेनेला धडा शिकविण्याचे आवाहन केले.
उद्धव ठाकरेंना व्यासपीठावर सर्व नेत्यांपेक्षा वेगळी उंच खुर्ची दिली होती. ते म्हणाले की, आम्ही भाजपा सोबत असताना जे जमले नाही ते मविआने घडवून आणले आहे. त्यांची वृत्तीच तशी आहे. कोंबडे झुंजवतात, जातींमध्ये तेढ निर्माण करतात. हे सुरू झाले की, समजा निवडणुका आल्या. आता हिंदू जनआक्रोश मोर्चे काढतात. जगातील सर्वात ताकदवान नेता इथे पंतप्रधान असताना हिंदू जनआक्रोशाची वेळ का येते? तुम्ही म्हणाल ते देशद्रोही ही मस्ती असेल तर ती गाडायला वज्रमूठ उभारली आहे. एका बाजूला पदवी दाखवून नोकरी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी मागितली तर दंड होतो. कोणत्या कॉलेजचे ते विद्यार्थी आहेत? कॉलेजला अभिमान वाटला पाहिजे, पण इथे दंड होतो. छत्रपतींचे नाव घेता, संभाजींचे नाव घेता आणि मागून वार करतात. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो तर तुम्ही मिंधे सरकारचे काय चाटताय? नितीश बरोबर सरकार होते तेव्हा त्यांचे काय चाटत होता? देशातील विरोधी पक्षातील सर्व भ्रष्ट भारतीय जनता पक्षात आहे. हा भारताच्या जनतेचा अपमान आहे. देशातील लोकशाही संपवून टाकायची. स्वतःचा पक्ष सोडून सर्व पक्ष संपवायचे हे सुरू आहे. न्यायवृंद आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी लोकशाही संपेल. निवडून दिले म्हणजे तुमच्यामागे येऊ म्हणजे लोकशाही नाही. मी घराबाहेर पडलो नाही हे खरे आहे, पण तुम्ही गुवाहाटीपर्यंत जाऊन काय केले? शेतकऱ्यांना काय मिळाले? त्यांना विम्याचे दहा रुपयांचे चेक देता? भाजपाने आपला वापर करून घेतला. आता त्यांना खाली ओढायचे आहे. माझ्या पक्षाचे नाव चोरले, चिन्ह चोरले, माझ्या बापाचे नाव चोरले, त्यांच्या बापाला काय वाटत असेल की, त्याची मुले दुसऱ्याचा बाप चोरतात. कागदावर लिहिलेले अडखळत वाचाल, पण जनता मतदान करीत तेव्हा वाचू शकणार नाही. शिवसेना संपविण्यासाठी खेळ सुरू आहे. पण मी भाजपा संपवल्याशिवाय राहणार नाही. जो देशावर प्रहार करील त्यांच्या ठिकऱ्या उडवू. आमचे हिंदुत्व शेंडी, जानव्याचे नाही. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आले आहे, ते भाजपमधल्या सावरकरभक्तांना तरी मान्य आहे का? आपल्याला भारतमातेचे रक्षण करायचे आहे. भाजपा आम्ही नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. मोठी केलेली माणसे गेली पण मोठी करणारी माणसे आजही सोबत आहेत. मविआची वज्रमूठ भारतमातेचे रक्षण करेल, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी \’वज्रमूठ\’ सभेत व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एकत्रित लढ्याचे आवाहन करीत म्हटले की, सरकारे पाडण्याचे काम करीत राहिले तर राज्यांसाठी घातक आहे. सतत अस्थिरपणा असेल तर प्रशासन काम करीत नाही, उद्योग येत नाहीत. मराठवाड्याच्या जनतेचा मुख्यमंत्री अपमान करतात. मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री केवळ 13 मिनिटे उपस्थित राहिले. मराठवाड्याच्या पालकमंत्र्यांच्या समितीला निधी देत नाहीत. आज इथे सभा होत असताना केंद्राचे दोन मंत्री, राज्याचे मंत्री गौरव यात्रा काढत आहेत. राज्यपाल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत होते तेव्हा हे मूग गिळून का गप्प बसले? सावरकरांच्या बाबतीत काही बोलले गेले, पण वडिलकीने समजावल्यावर तेही थांबले. महागाई वाढते, बेरोजगारी वाढते, उद्योग गेले आणि हे म्हणतात की, सर्वसामान्यांचे सरकार आहे. अवकाळी पावसाची भरपाई मिळाली नाही, विम्याचे पैसे मिळाले नाहीत. फक्त धर्म, प्रांत यावर मतभेद निर्माण करीत आहेत. केंद्रात तुमचे सरकार आहे, तुमच्यात ताकद असेल, तर सावरकरांना भारतरत्न द्या. बेरोजगारी, महागाई यावरून लक्ष हटवायला अनेक घटना घडत आहेत, वातावरण बिघडवले जात आहे.
मुठीत मशाल, पंजाची मदत आणि मनगटात घड्याळ घालून वज्रमूठ टिकवा आणि लढा द्या.
80% उद्धव सेना तर 20%काँग्रेस
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून 80 टक्के प्रयत्न झाले. सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याचे दिसत होते.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदारांनी बंडखोरी करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यातील दोघांना मंत्रिपददेखील मिळाले. त्याला उत्तर म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद याच शहरात देण्यात आले. त्यामुळे अजूनही उद्धव सेनेची संघटना कायम आहे. त्याच जोरावर छत्रपती संभाजीनगरात वज्रमूठ सभेचे आयोजन केले गेले. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने उद्धव सेनेच्या आगामी वाटचालीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. अर्थात त्यामुळे उद्धव सेनेकडून सभेच्या यशस्वितेसाठी कसोशीने प्रयत्न झाले.
निमंत्रण पत्रिकेवरही उद्धव ठाकरे गटच
जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेवर बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांचे मोठे छायाचित्र वापरले आहे. तर सभेच्या ठिकाणी स्टेजवर बाळासाहेब आणि मीनाताई यांचे मोठे पोस्टर वापरले होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचेही मोठे छायाचित्र होते. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लहान आकारातील छायाचित्रे निमंत्रण पत्रिकेवर छापली होती.
जंगी रंगली पोस्टरबाजी
छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचे बॅनर जागोजागी लावण्यात आले होते. मात्र त्याच ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, अशी टीका करणारे बॅनर देखील लावण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून या बॅनरबाजीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये दिसून आली. दिवस-रात्र टीव्हीसमोर वक्तव्य करणाऱ्यांनी खोडसाळपणे हे सर्व केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाठ यांच्यावर निशाणा साधत केला.
तिन्ही पक्षांचे झेंडे
चार दिवसांपूर्वी संभाजीनगरातील किराडपुरा भागात दोन गटांत हाणामारी झाली होती. त्यानंतर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातील वातावरण तापले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची सभा होणार की, नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर पोलिसांनीही 15 अटींवर सभेची परवानगी दिली.
सभेला परवानगी मिळाल्यानंतर लगेच सभेच्या तयारीला वेग आला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रचंड मोठ्या मैदानात स्टेज बांधला गेला. मैदानात खुर्च्या टाकण्यात आल्या. ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली. सभेच्या ठिकाणच्या भोवती 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. सभेच्या ठिकाणी आणि शहरात मिळून एक हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. दोन डीआयजी, आयपीसएस अधिकारी, चार डीसीपी, तीन एसीपी, 20 पोलीस निरीक्षक आणि 25 पोलीस उपनिरीक्षक या सभेसाठी तैनात करण्यात आले होते.
सभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर शहरात रॅपिड ॲक्शन फोर्स आणि तीन एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिसांकडून वारंवार सभेच्या परिसराची पाहणी केली जात होती. श्वान पथकाकडून सभा मंडपासह सभेच्या परिसराची पाहणी केली जात होती.
महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा होत असल्याने संपूर्ण संभाजीनगरात तिन्ही पक्षांचे झेंडे लावण्यात आले होते. तसेच चौकाचौकात पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले. याशिवाय या सभेची दवंडी दिली गेली. लोकांना सभेला येण्याचे आवतन दिले जात होते. शिंदे सरकारचा पर्दाफाश होणार असल्याचे दवंडी देणारा सांगत होता. त्यामुळे प्रत्येक नाक्यावर, चौकात आणि चहाच्या टपऱ्यांवर सभेची जोरदार चर्चा सुरू होती .
नाना पटोले गैरहजर
नाना पटोले सभेला हजर राहिले नाहीत. नाना पटोले हे सभेत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते, पण अचानक नाना पटोले सभेला येणार नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण नाना पटोले यांचे न येण्यामागील कारणही समोर आले आहे. नाना पटोले यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव नाना पटोले या सभेला अनुपस्थित होते.

Scroll to Top