अंबरनाथ – ‘आमचे कोणीच वाकडे करू शकत नाही, असे समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या कर्नाटकातील विजयावर देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. राज ठाकरे आज अंबरनाथच्या दौऱ्यावर आले होते. कर्नाटक निवडणूक निकालाबद्दल पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘कितीही नाकारले तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे. मात्र पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. मागे एकदा मी माझ्या भाषणात म्हटले होते की विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपले कोण वाकडे करू शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. तो सर्वांनीच घ्यावा.’
कर्नाटकाच्या निकालाने महाराष्ट्रात बदलाचे संकेत आहेत असे वाटते का? असा प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले, ‘आताच कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय घडते हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही.’
‘पहाटेचा शपथविधी हा ठाकरे गटाला धडा शिकवण्यासाठी घेतला होता,’ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या या विधानावर राज ठाकरे म्हणाले, ‘तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला धडे शिकवू नका. तुम्ही या गोष्टी केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचे हे राजकारण झाले. आता उगाच सारवासारव करू नका.’
जनतेला कधीही गृहित धरू नका! भाजपच्या पराभवानंतर मनसेचा टोला
