कीव : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा २० मार्चला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले होते. मात्र, येथून ते अचानक मंगळवारी सकाळी युक्रेनमध्ये दाखल झाले असून, ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे जपानचे पंतप्रधान सोमवारी भारत दौऱ्यावर होते. त्यांचा येथे दोन दिवसाचा मुक्काम होता. मात्र काही तासांनी जपानच्या पंतप्रधानांची युक्रेन दौऱ्याबाबत चर्चा सुरू झाली. मंगळवारी सकाळीच पंतप्रधान किशिदा पोलंडहून ट्रेनने युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहेत.
जपान येत्या मे महिन्यात जी-७ परिषद आयोजित करणार आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे एकमेव जी-७ परिषदेचे नेते आहेत. मात्र अद्याप त्यांनी युक्रेनला भेट दिली नाही. अशा स्थितीत जी-७च्या आधी किशिदा युक्रेनला जाऊन तेथील आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. त्यामुळे त्यांची ही भेट असल्याचे समजते. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे देखील रशियाच्या दौऱ्यावर असून ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मॉस्कोमध्ये भेट घेणार आहेत. त्यामुळे जपानच्या पंतप्रधानांचा युक्रेन दौरा महत्त्वाचा आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा जपानने नेहमीच विरोध केला आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी देखील झेलेन्स्की यांची भेट घेत युक्रेनच्या पाठीशी उभे असल्याचे बायडेन म्हणाले होते.अशावेळी अमेरिकेचा मित्र देश युक्रेनला भेट देणे महत्त्वाचे असल्याने ते तडक युक्रेनला रवाना झाले आहेत. गेल्या महिन्यातच, जपानने युक्रेनला मदतीसाठी ५.५ अब्ज डॉलर्सची देणगी देखील जाहीर केली होती. तर आता युक्रेनला रवाना झालेले किशिदा हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनाही जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणार आहेत.