नवी दिल्ली : भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी७ हिरोशिमा शिखर परिषदेचे निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुमियो किशिदा यांचे स्वागत करत त्यांचे निमंत्रण स्वीकारले. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यावर या दौऱ्यात चर्चा होणार आहे.
पंतप्रधान किशिदा यांनी मुक्त हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्रासाठी भारताच्या वाढत्या भूमिकेवरही त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्रात चीन सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. त्यामुळेच भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी चतुर्भुज तयार करून चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्याची योजना आखली पाहिजे. मुक्त हिंद पॅसिफिक महासागर क्षेत्रासाठी भारत आणि जपानमध्ये गस्त वाढवणे, सागरी कायद्यांचे पालन करण्याची क्षमता वाढवणे, सायबर सुरक्षा, डिजिटल आणि हरित ऊर्जा यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. किशिदा यांच्या स्वागतावेळी मराठमोळी लावणी लावण्यात आली होती. \’वाजले की बारा\’ या लावणीवर नाचणाऱ्या मुलींना पाहून त्यांचे नृत्य पाहण्याचा मोह जपानच्या पंतप्रधानांनाही आवरला नाही. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे देखील उपस्थित होते. किशिदा यांनी काही वेळ थांबून लावणी नृत्य पाहिले.