जपानला ‘शानशान’ वादळाचा तडाखा ३ जणांचा मृत्यू ! घरांचे प्रचंड नुकसान

टोकिओ – जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर आज सकाळी ‘शानशान’ वादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे घरांची छते उडाली आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यासोबत रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली. या वादळात तीन जणांचा मृत्यू झाला. या वादळाचा ताशी २५२ किलोमीटर वेग होता. या वादळामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द झाली. गामागोरी शहरात भूस्खलनामुळे एका कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि ३० वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. हवामान खात्याने पुढे सांगितले की, शानशान चक्रीवादळामुळे मंगळवारपासून जपानमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हे वादळ आता जपानच्या उत्तरेकडे सरकले आहे. शुक्रवारपर्यंत पश्चिम जपानमध्ये मुसळधार पावसामुळे आपत्तीचा धोका झपाट्याने वाढू शकतो, त्यामुळे येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.