जम्मू काश्मीर सुरक्षेचा आढावा! अमित शहांनी विशेष बैठक घेतली

नवी दिल्ली- जम्मू काश्मिरमधील दहशतवादी कारवायांचा पूर्ण बिमोड करण्याबरोबरच घुसखोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येईल असे आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृह विभागाचे मुख्य सचिव, जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल यांच्यासह लष्कर व निमलष्करी दलाचे प्रमुख अधिकारी तसेच केंद्रीय गुप्तचर दलाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात झालेले दहशतवादी हल्ले , त्याचप्रमाणे अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी उपाययोजनांच्या योजनेचे सादरीकरण केले. या भागातून दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी एक परिपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याबाबत चर्चा झाली. यात्रेवरील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी अमरनाथ मार्गाव्यतिरिक्त नजिकच्या भागातील सुरक्षा व्यवस्था व तपासणी वाढवण्यात येणार आहे. यात्रेची सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात आली असून या भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी शक्य त्या सर्व अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्याच्या सूचना यावेळी अमित शाह यांनी दिल्या. दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात लष्कर व स्थानिक पोलीस दलांना पूर्ण सूट देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top