जलसंधारणाची कामे न झाल्याने यंदा पाणीटंचाई दाहकता वाढणार

ठाणे- अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशातच जलसंधारणाची कामे हव्या त्या प्रमाणात झाली नसल्याने याचा मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार यंदा ९७ गावे आणि २८९ पाड्यांना पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या टंचाई कृती आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत ४० गावे आणि १३७ पाड्यांना ३० टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात होता. तर, २०१२-१३ या वर्षात ३८ गावे आणि ९८ पाडे अशा एकूण १३६ गावपाड्यांना पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. २०१४ मध्ये दोन जिल्हे एकत्र असताना २०८ गावे आणि ४५८ गावपाड्यांसाठी पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आले होते. विशेषतः मोखाडा, वाडा, जव्हार, तलासरी, डहाणू, पालघर हे बहुतांशी दुर्गम तालुके पालघर जिल्ह्यात गेल्यामुळे उर्वरीत ठाणे जिल्ह्यात शहरी भागांचे प्रमाण मोठे असल्याने पाणीटंचाईची झळ कमी बसेल अशी अपेक्षा होती. मात्र, २०१५ साली भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील १७८ गावे आणि ३९५ पाड्यांचा समावेश टंचाई कृती आराखड्यात करण्यात आला होता. गेल्या काही वर्षात पाणीटंचाईयुक्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली. २०१६-१७ साली ३२६ पाडे आणि ९५ गावे, २०१७-१८ साली ४१ गावे आणि १२० पाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली होती. २०२०-२१ साली ८७ गावे आणि २१४ पाड्यांना टँकर आणि बैलगाडीने पाणीपुरवठा करावा लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top