जळगाव
जळगावच्या लोण गावातील सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाचा मंगळवारी सैन्य दलाच्या गाडीतून अरुणाचल प्रदेशात जात असताना अपघाती मृत्यू झाला. लीलाधर नाना पाटील (वय ४२ वर्षे) असे जवानाचे नाव आहे. सैन्य दलाच्या ज्या गाडीतून लीलाधर पाटील हे इतर जवानांसोबत जात होते, त्या गाडीचे अचानक मागचे फाटक तुटल्याने लीलाधर पाटील हे खाली पडले. दगडाचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लीलाधर पाटील यांचे पार्थीव उद्या गुरुवारी त्यांच्या मूळ गावी लोण येथे आणण्यात येणार आहे. या ठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
सीमा सुरक्षा दलाचे जवान पहाडी रस्त्याने अरुणाचल प्रदेश मध्ये जात होते. या वाहनात जवान लीलाधर पाटील हे मागच्या बाजूने बसले होते. याचदरम्यान प्रवासात एके ठिकाणी अचानक जवान जात असलेल्या ट्रकचे मागचे फाटक तुटले. मागे बसलेले लीलाधर पाटील हे ट्रकमधून बाहेर खाली पडले. खाली पडल्यानंतर दगडांचा जोरदार मार लागल्याने लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन थांबवून वाहनातील जवान हे लीलाधर पाटील पडल्याच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत लीलाधर पाटील यांची प्राणज्योल मालवली होती. अमळनेर तालुक्यातील लोण येथील लीलाधर पाटील हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. सध्या ते आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतरही त्यांनी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ वाढवून घेतला होता.