छत्रपती संभाजीनगर- मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणदेखील पूर्ण भरले असून धरणातील पाणी आजूबाजूच्या परिसरातील शेतात घुसले आहे. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ही परिस्थिती पाहून संतप्त शेतकऱ्यांनी कुटुंबासह पाण्यात उतरून आंदोलन केले. जायकवाडी धरणात गाळ साचल्याने बॅकवाटर फुगवटा क्षेत्राचे पाणी गंगापूर तालुक्यातील शेकडो एकर जमीन आणि पिकांमध्ये शिरले. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी सरकारकडे अर्ज तक्रारी आणि निवेदन दिले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. परिणामी गंगापूर तालुक्यातील गोदावरी काठच्या अमळनेर परिसरातील शेतकऱ्यांनी लहान मुले आणि महिलासह आंदोलनात दोन तास पाण्यात उतरत आंदोलन केले.
