जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध नाहीच

मुंबई – अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणी तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला शुक्रवारी निर्दोष घोषित केले. सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. पुराव्यांअभावी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद म्हणाले. मात्र कोर्टाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.
दरम्यान, जिया खान मृत्यू प्रकरणी 20 एप्रिल रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. यावर आज सकाळी 10:30 वाजता या प्रकरणावर विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावणी घेतली. सूरज पांचोली आज सकाळी 10 वाजता आई जरीना वहाबसोबत मुंबईतील सीबीआयच्या स्पेशल कोर्टात दाखल झाला होता.
2 जून 2013 रोजी जियाने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाची आई राबिया यांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. त्यांनी सूरजवर जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाच्या आत्महत्येनंतर 7 जून रोजी पोलिसांना तिच्या घरातून 6 पानी सुसाईड नोट मिळाली होती. त्या सुसाईड नोटमध्ये जियाने सूरज पांचोलीचा उल्लेख केला होता. सुसाईड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे, जिया आणि सूरज दोघांची सोशल मीडियावरून मैत्री झाली होती. त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ट आले. त्यामुळे जिया खूप अस्वस्थ होती. जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने तिला काही मेसेज पाठवले होते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
सूरजने जियाला 10 मेसेज पाठवले होते, ज्यांची भाषा खूपच वाईट होती. आत्महत्येच्या दिवशी जियाने सूरजला अनेकवेळा फोन केला, पण त्याने जियाशी बोलणे टाळले. जियाने तिच्या पत्रात सूरज पांचोलीबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. त्याने केवळ आपल्याला दुःख यातनाच दिल्या असल्याचेही जियाने त्या पत्रात लिहिले होते.
सूरज पांचोली याच्या बाजूने निकाल लागल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, असे त्यामध्ये लिहिले आहे. जिया खानची आई राबिया यांनी या निकालानंतर, न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षाभंग झाला आहे. आपला लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया देत या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top