वाशिम : वाशिमच्या अनसिंग मार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी वाशिम शहर महिला प्रमुख रंजना पौळकर यांचा एप्रिल २०२२ मध्ये अपघात झाला होता. त्या अपघातात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. तो अपघात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी केल्याचा आरोप रंजना पौळकर यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यावेळी केली असतानाही अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे पौळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा अपघात नसून जीवानिशी संपविण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर देखील आपल्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. दोन वेळा अशाप्रकारे प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे योग्य तो तपास करून न्याय द्यावा अन्यथा २४ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा पौळकर यांनी दिला आहे.