नवी दिल्ली – नवी दिल्ली येथे उद्या 9 व 10 सप्टेंबर दरम्यान होणार्या जी-20 शिखर परिषदेसाठी अनेक बडे जागतिक नेते आज नवी दिल्लीत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या एअरफोर्स वन या सरकारी विमानाने भारतात पोहोचले. केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नागरी उड्डयण राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी त्यांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले.
बायडन यांच्यासोबत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान, डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ जेन ओमॅली डिलॉन, ओव्हल ऑफिस ऑपरेशनचे संचालक अनी टोमासिनी हेही भारतात आले आहेत. बायडन हे मोदी यांच्याबरोबर स्वच्छ ऊर्जा, व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण या विषयांवर द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिओ मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना,
अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह हेदेखील आज दिल्लीत दाखल झाले. जी-20 च्या निमित्ताने 40 देशांचे राष्ट्रप्रमुख दोन दिवस दिल्लीत राहणार आहेत. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवण्यात आली आहे. दिल्लीत सुरक्षाव्यवस्थाही अत्यंत कडक करण्यात आली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत आज दुपारी नवी दिल्लीत पोहोचले. केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी त्यांचे स्वागत केले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी स्वागत केले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद तिनुबू हे कालच दिल्लीत आले आहेत. अध्यक्ष अहमद तिनुबू यांचे स्वागत ‘आता वाजले की बारा’ यासारख्या मराठी गीतांनी करण्यात आले. जी-20 परिषदेच्या निमित्ताने 40 देशांचे राष्ट्रप्रमुख नवी दिल्लीत येणार आहेत. या परिषदेत 14 आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. याशिवाय आणखी 9 देशांना या परिषदेत पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेला चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्याऐवजी या देशांचे प्रतिनिधी भारतात आले आहेत. या परिषदेला येणार असलेले स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ हे कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे ते या परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी स्पेनच्या उपराष्ट्राध्यक्ष नादिया कॅल्विनो आणि परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बेरेस या परिषदेसाठी आले आहेत. प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या ‘भारत मंडपम’ या आंतरराष्ट्रीय संमेलन आणि प्रदर्शन केंद्रामध्ये ही परिषद होणार आहे. 2700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या केंद्राला पंतप्रधान मोदी यांनी 27 जुलै रोजी राष्ट्राला समर्पित केले होते. 123 एकरवर बांधलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल, अॅम्फी थिएटर इत्यादींसह अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. पाहुण्यांना अनेक प्रकारच्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्यात मिलेट म्हणजे भरड धान्यापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा विशेष समावेश आहे. या स्नेहभोजनासाठी राजस्थानमधून चांदी व गोल्ड प्लेटेड ताट, वाट्या आणि ग्लास तयार करून घेण्यात आले आहेत. देश-विदेशातून विशेष शेफ बोलावण्यात
आले आहेत. जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशभरातील हवाई क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने फाल्कन अवॅक्स विमाने तैनात केली आहेत. हिंडन एअरबेस, अंबाला, सिरसा, भटिंडा, दिल्लीच्या आसपासच्या विमानतळांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. फायटर जेट राफेल, ड्रोनविरोधी यंत्रणा याशिवाय हवाई दलाने 70 ते 80 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. कोणत्याही अज्ञात विमानाचा किंवा क्षेपणास्त्राचा शोध घेण्यासाठी एअरबोर्न अर्ली वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टम तैनात केल्या आहेत. हवाई दलाचे पहिले स्वदेशी विमान ‘नेत्रा’ दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर लक्ष ठेवणार आहे.
जी-20 बैठकीसाठी जो बायडन दिल्लीत
