जेएनपीटी रुग्णालयाचे खासगीकरण
कामगार,प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध

उरण – उरण तालुक्यातील जेएनपीटी प्रशासनाने १९९८ साली खासगीकरणाचा झेंडा फडकावला असून आता या बंदराच्या कामगार वसाहतीत असलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निश्चय केला आहे.त्यामुळे या रुग्णालयातील १२५ कामगारांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या कामगारांसह स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या खासगीकरणाला प्रखर विरोध दर्शविला आहे. त्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा जेएनपीटी कामगार एकता संघटनेने दिला आहे.
जेएनपीटी वसाहतीमध्ये असलेले हे रुग्णालय तेथील कामगार आणि त्यांच्या कुटुंबासह स्थानिक प्रकल्पग्रस्तांना फारच सोयीचे बनले आहे.रात्री अपरात्री अत्यवस्थ रुग्णाला किंवा अपघातग्रस्तांना याठिकाणी चांगली सेवा मिळते.त्यामुळे काही दिवसांपासुन प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना येथील वैद्यकीय सेवा मोफत मिळावी अशी मागणी केली जात असताना आता याच रुग्णालयाचे खासगीकरण केले जाणार आहे. तशी जाहिरातही वर्तमानपत्रात दिली आहे.या रुग्णालयाचे खासगीकरण करून हे रुग्णालय १०० खाटांचे केले जाणार आहे.मात्र खासगीकरण झाले तर आधीच्या कामगारांचे काय होणार आणि प्रकल्पग्रस्तांना आता मिळत असलेली हक्काची वैद्यकीय सेवा यापुढे मिळेल का अशी शंका वाटत आहे.त्यामुळेच रुग्णालयाच्या खासगीकरणाला कामगार वर्गासह स्थानिक प्रकल्पग्रस्तांनीही तीव्र विरोध दर्शविला आहे.

Scroll to Top