पुणे – खंडोबा देवस्थान विश्वस्तपद निवडी विरोधातील जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 करण्याचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनी सुनावणीत घेतला. जेजुरी ग्रामस्थ 6 आणि बाहेरचे 5 असे एकूण 11 विश्वस्तांची नियुक्ती होणार आहे. घटना दुरुस्ती करुन पुन्हा एकदा सोमवारी अंतिम सुनावणी होणार असल्याचे धर्मादाय आयुक्तांनी जाहीर केले. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील 7 पैकी 5 जणांवर जेजुरीबाहेरील व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. यावरून पुकारलेले आंदोलन आज 13 व्या दिवशीही जेजुरीतील ग्रामस्थांनी सुरूच ठेवले होते. आज कीर्तन करुन ग्रामस्थांनी आपल्या आंदोलनाची धार कायम ठेवली होती. सोमवारी ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे जेजुरीतील खंडोबा देवस्थानाच्या विश्वस्त निवडीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी झाली. ग्रामस्थांनी विश्वस्त मंडळातील सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. जर मागणी आज मान्य झाली नाहीतर सोमवारपासून जेजुरीत बंदची हाक देऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. अखेर आज धर्मादाय आयुक्तांनी सुनावणीत विश्वस्त मंडळाची सदस्यसंख्या 7 वरुन 11 करण्याचा निर्णय घेतला.
जेजुरी ग्रामस्थांच्या लढ्याला यश विश्वस्तांची संख्या 7 वरुन 11 होणार
