मुंबई – भायखळा येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे.समूह रुग्णालयात सर्वात मोठ्या शस्त्रक्रिया अतिदक्षता विभागाचे व नूतनीकरण केलेल्या मॉड्युलर शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.हे अतिदक्षता विभाग ३४ अद्ययावत खाटांनी सुसज्ज आहे.वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना क्लास रूममध्ये बसून येथील शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
याठिकाणी वेगळा आयसोलेशन कक्ष आणि बायोमेडिकल वेस्ट कक्षासह निगेटिव्ह प्रेशर रूमचीही सोय असणार आहे. त्याचप्रमाणे नूतनीकरण करण्यात आलेला मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागही सर्व अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असून तो स्वयंचलित पद्धतीने वापरता येणार आहे.उद्घाटनप्रसंगी स्थानिक आमदार यामिनी जाधव उपस्थित होत्या. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,आयुक्त राजीव निवतकर,संचालक डॉ.अजय चंदनवाले, वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे.जे.समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय सुरासे व इतर मान्यवर उपस्थित होते.