डेहराडून – उत्तराखंडच्या बद्रीनाथ या चार धामपैकी एक असलेल्या तीर्थस्थळाजवळील जोशीमठ भाग हा अतिसंवेदनशील भाग आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर वसलेला हा भाग खचत चालला असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. पण आता सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागातील काही घरांनाही तडे गेल्याने येथील राहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
काही महिन्यांपूर्वी जोशीमठ चर्चेत आला होता. कारण पर्वतीय भागातील या जमिनीचा भार वाढल्याने ती खचत चालली असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला होता. मात्र आता जोशीमठमधील सुरक्षित भागातील काही इमारतीनाही नुकतेच तडे गेल्याचे समोर आले आहे. इथल्या गांधीनगर वॉर्डमधील काही घरांना तडे गेल्याचे दिसून आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे यंदाच्या पावसामुळे हे तडे गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. यामध्ये रेड झोनमधील घरांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले आहे. तर त्या तुलनेत अधिक सुरक्षित मानल्या गेलेल्या यलो झोनमधील घरांनाही आता तडे गेल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जवळपास ५०० घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे आता इथे राहणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित कॅम्पमध्ये नेण्यात आले आहे.
तीर्थक्षेत्र असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. याच बांधकामांमुळे जमिनीवरचा भार वाढून भुस्खलनाच्या धोक्याचा इशारा वैज्ञानिक आणि जिओलॉजिस्ट अनेक दशकांपासून देत होते, त्याचाच हे परिणाम आता दिसायला लागला असल्याचे समोर येत आहे.